म्हसवड पोलीस ठाण्याची जुलै 2025 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व टीमला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान
सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांपैकी म्हसवड पोलीस ठाणे हे माहे जुलै 2025 मधील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून घोषित झाले आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून, दर महिन्याला जनहितासाठी केलेल्या विशेष कामगिरीच्या आधारे सर्वोत्कृष्ट ठाण्याची निवड केली जाते.
या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलीस ठाण्याने जुलै महिन्यात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली.
🔹 सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्गती पुरस्कार :
म्हसवड पोलीस ठाण्याने जिल्ह्यातील सर्वाधिक मुद्देमाल निर्गती करून तक्रारदार, फिर्यादी व साक्षीदारांना तो परत दिला.
🔹 महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार :
शाळा–महाविद्यालयांमध्ये गुड टच–बॅड टच याविषयी मार्गदर्शन, मुलींच्या छेडछाडीवर कारवाई, रोड रोमियोंवर नियंत्रण तसेच गरजू मुलींना तातडीने मदत या कामगिरीमुळे म्हसवड पोलीस ठाण्याला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्पाचा पुरस्कार मिळाला.
🔹 गंभीर गुन्ह्यांचा वेगवान तपास :
महिलांविरोधातील गंभीर स्वरूपाचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उकलून, पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या तातडीच्या व काटेकोर कामगिरीबद्दलही पोलीस ठाण्याला प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सदरचे सर्व पुरस्कार व प्रशंसापत्रे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते क्राईम कॉन्फरन्समध्ये प्रदान करण्यात आली.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या यशामागे योगदान देणारी टीम :
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शशिकांत खाडे, रूपाली फडतरे, सतीश जाधव, राहुल थोरात, हर्षदा गडदे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली.
यामुळे म्हसवड पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात आपली छाप सोडली असून, सातत्याने मिळणारे हे सन्मान जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारे ठरत आहेत.

Post a Comment
0 Comments