Type Here to Get Search Results !

सासपडे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात; आरोपीस फाशीची शिफारस – रुपाली चाकणकर


 सासपडे प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार; आरोपीस फाशीची शिफारस – राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर 


वेणेगाव ( प्रमोद पंचपोर) : सासपडे (ता. सातारा) येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या प्रकरणी राज्य महिला आयोग गंभीर झाला आहे. पीडित कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणाची सुनावणी फास्ट्रॅक न्यायालयात करण्यात येणार असून, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आयोगाकडून शिफारस करण्यात येईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी दिली.

श्रीमती चाकणकर यांनी सासपडे येथे जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते. कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस संरक्षण देण्याचे आदेश श्रीमती चाकणकर यांनी दिले. तसेच ‘मनोधैर्य’ योजनेतून कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील मदतीची प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी नमूद केले. न्यायालयात अधिकाधिक पुरावे सादर करून आरोपीला कठोर शिक्षा – फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी राज्य महिला आयोग सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सासपडे सारखी घटना पुन्हा सातारा जिल्ह्यात घडू नये, यासाठी पोक्सो गुन्ह्यातील सुटलेल्या आरोपींवर कठोर लक्ष ठेवावे व त्यांच्या हालचालींची तपासणी करावी, अशा सूचना श्रीमती चाकणकर यांनी पोलीस विभागाला दिल्या.

👉 या प्रकरणी राज्य महिला आयोगाचे तत्पर हस्तक्षेप आणि न्यायासाठीची बांधिलकी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.




Post a Comment

0 Comments