सासपडे येथे दोन अनोळखी इसमांकडून महिलेची फसवणूक — सोन्याचे टॉप्स लंपास
वेणेगाव : सातारा तालुक्यातील सासपडे येथे घडलेल्या एका फसवणुकीच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. सविता गौतम लादे (वय 36 वर्षे, व्यवसाय – वडापाव विक्री, रा. सासपडे) या महिलेस दोन अनोळखी इसमांनी “आयुर्वेदिक औषध” देण्याच्या बहाण्याने घरात फसवून सुमारे 15,000 रुपये किंमतीचे, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स लंपास केल्याची घटना घडली आहे.
हि घटना दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी अंदाजे 8.30 वाजता घडली असून फिर्याद आज, दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अनोळखी इसमांनी घरात येऊन तांदूळ, पांढरा धागा आणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तिच्या कानातील सोन्याचे टॉप्स काढून तांदळावर ठेवायला सांगून “नाडी तपासणी”च्या बहाण्याने तिचे डोळे बंद करून काहीतरी मंत्रपठण केले. त्यानंतर त्यांनी कागदाची पुडी बांधून औषधाचे पैसे मागितले, परंतु पैसे नसल्याचे सांगताच ते “आता परत येतो” असे म्हणून घरातून निघून गेले आणि टॉप्स घेऊन पसार झाले.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 252/2025 भा.दं.वि. कलम 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मपो.हवा जाधव करीत आहेत.
सदर घटनेचा पुढील तपास सुरू असून पोलीस नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करत आहेत
.

Post a Comment
0 Comments