श्री पद्मावती माता विद्यालयात वाचन व आरोग्याचे सुंदर संगम
वेणेगाव (प्रमोद पंचपोर) : श्री पद्मावती माता विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन तसेच जागतिक हात धुणे दिन संयुक्तरित्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त शिक्षक गणेश साळुंखे सर यांनी वाचनाचे महत्त्व, त्यातून मिळणारे ज्ञान आणि मनःशांती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना रोज वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले तसेच अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
त्याचप्रमाणे आरोग्यविषयक सवयींचा अंगीकार व्हावा यासाठी जागतिक हात धुणे दिना निमित्ताने विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. हे प्रात्यक्षिक भोरसे सर आणि साळुंखे भाव यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केले, ज्यामधून विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याची योग्य पद्धत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयात वाचन, प्रेरणा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम घडवून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयींचा संस्कार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.

Post a Comment
0 Comments