Type Here to Get Search Results !

कराड उत्तरमधील रस्ते व पुलांसाठी भरीव निधी देणार – ना. नितीन गडकरी

 

कराड उत्तरमधील रस्ते व पुलांसाठी भरीव निधी देणार – ना. नितीन गडकरी

उंब्रज उड्डाणपुलाला मंजुरी; आ. मनोजदादा घोरपडे यांचा यशस्वी पाठपुरावा

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांनी दिली आहे. उंब्रज येथील अत्यंत आवश्यक असलेल्या पारदर्शक उड्डाणपुलास मंजुरी मिळाल्याबद्दल आ. मनोजदादा घोरपडे यांनी नागपूर येथील ना. गडकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत शाल, श्रीफळ व प्रसिद्ध सातारी कंदी पेढे देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

उंब्रज येथे उड्डाणपुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या प्रश्नाची गंभीर दखल घेत मागील अधिवेशनात आ. मनोजदादा घोरपडे यांनी हा मुद्दा विधानसभेत ठामपणे मांडला. त्यानंतर अधिवेशन काळात त्यांनी ना. नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उंब्रज पारदर्शक उड्डाणपुलासाठी आग्रही मागणी केली.

ना. गडकरी यांच्या सूचनेनुसार त्यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी उंब्रज येथे प्रत्यक्ष पाहणी करून योग्य प्रस्ताव तयार केला. आ. मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर उंब्रज उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली असून या कामासाठी टेंडरही निघाले आहे.

या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येईल तसेच कोणत्याही जागेचे अतिरिक्त भूसंपादन केले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ना. नितीनजी गडकरी यांनी दिली. नागपूर येथे झालेल्या भेटीत उंब्रज ग्रामपंचायत तसेच परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

चौकट :

वेणेगाव–काशिळ–कोपर्डे येथील नदीच्या संगमावरील पुलासाठी निधीची तरतूद मंजूर झाली आहे. तसेच पुढील काळात कराड उत्तरमधील प्रमुख रस्ते सीआयआरएफ (CIRF) मधून काँक्रीट रस्त्यांमध्ये रूपांतरित करण्याचा आराखडा तयार असून, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी आ. मनोजदादा घोरपडे यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments