Type Here to Get Search Results !

बोरगाव पोलिसांची मोठी कारवाई : २.६७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा–पानमसाला साठा जप्त

 बोरगाव पोलिसांची मोठी कारवाई : २.६७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा–पानमसाला साठा जप्त 

वेणेगाव - महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेल्या बंदीला धाब्यावर बसवत वाहतूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागठाणे पुल ओलांडून बोरगाव ब्रीजजवळ झालेल्या कारवाईत २ लाख ६७ हजार १३२ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास महिंद्रा पिकअप (MH 51 C 1380) या वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, वाहनाचा अज्ञात चालक व मालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

या कारवाईत विमल पानमसाला (बिग पॅक, किंग पॅक – विविध रंगांचे) तसेच वि–१ टोबॅको अशा एकूण १७५ किलो वजनाचा प्रतिबंधित साठा पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. जप्त मालाची एकूण बाजार किंमत ₹२,६७,१३२/- इतकी आहे.

सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे (अन्न व औषध प्रशासन, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम २००६, तसेच भा.न्या.सं. २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अशा पदार्थांवर एक वर्षाची बंदी असतानाही त्याची साठवणूक व वाहतूक केल्याने हा गंभीर गुन्हा ठरतो.

या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी उपनिरीक्षक भोसले करीत असून, कारवाईत सपोनि काटकर यांनी सहभाग घेतला. फरार चालक व वाहनमालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले



Post a Comment

0 Comments