Type Here to Get Search Results !

वेणेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनरेटर केवळ देखाव्यासाठीच?

  वेणेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनरेटर केवळ देखाव्यासाठीच?

ग्रामीण रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबणार कधी?

प्रतिनिधी - वेणेगाव (ता. सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुमारे ६ कोटी ६३ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीतील जनरेटर सध्या केवळ शोपीस ठरत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या भव्य इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात झाले होते. मात्र, आज प्रत्यक्षात मात्र या आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधा धोक्यात असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात असल्याने वेणेगाव परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीगृह कार्यरत असताना, तसेच विविध जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणे वीजेवर अवलंबून असताना, जनरेटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, प्रत्यक्षात वीज गेल्यानंतर जनरेटर तत्काळ सुरू होत नसल्याने रुग्ण, विशेषतः गर्भवती महिला व नवजात बालकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिक व रुग्णांमधून असा सवाल उपस्थित केला जात आहे की,
“हा जनरेटर केवळ कागदोपत्री नोंदींसाठी आणि सर्विसच्या नावाखालीच ठेवण्यात आला आहे का?”
वीज गेल्यानंतर अनेक वेळा आरोग्य केंद्रात अंधाराचे साम्राज्य पसरते, यामुळे उपचारात अडथळे निर्माण होतात. काही वेळा कर्मचाऱ्यांना मोबाईल टॉर्च किंवा पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत असल्याचीही चर्चा आहे.
एवढ्या मोठ्या निधीतून उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जर जनरेटरच प्रभावीपणे कार्यरत नसेल, तर या खर्चाचा नेमका फायदा ग्रामीण जनतेला होतोय का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यामागे दुर्लक्ष, निष्काळजीपणा की नियोजनाचा अभाव, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
या प्रकरणात आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, जनरेटर कार्यान्वित स्थितीत आहे की नाही याची तपासणी करावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य हे प्रयोगशाळा नसून, त्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.




Post a Comment

0 Comments