Type Here to Get Search Results !

सासपडे मार्गावर अवजड वाहनांची धुळीची दहशत; प्रदूषण नियंत्रण विभागाला मागणी

 सासपडे मार्गावर अवजड वाहनांची धुळीची दहशत; प्रदूषण नियंत्रण विभागाला मागणी

 नागठाणे–सासपडे रोडवर धुळीचा कहर; नागरिक, व्यापारी त्रस्त

प्रतिनिधी: प्रमोद पंचपोर, 

नागठाणे – नागठाणे ते सासपडे या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असून या वाहनांमुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धूळ उडत आहे. परिणामी संपूर्ण परिसर धुळीच्या विळख्यात सापडला असून नागरिक, व्यापारी आणि ज्येष्ठ रहिवाशांचे दैनंदिन जगणे कठीण झाले आहे.

सासपडे परिसरातून सतत चालणारी  वाहतूक रस्त्यावर धुळीचे थर उडवत आहे. रस्त्यालगत असलेल्या कापड दुकाने, हॉटेल व्यवसाय, किराणा दुकानांसह इतर व्यापाऱ्यांना सकाळपासून दुकानभर साचलेली धूळ साफ करण्यात करावा लागत असून दिवसातील मोठा वेळ याच कामात खर्च होत आहे. ग्राहकांची वर्दळ कमी होऊन व्यापारावरही थेट परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

याचबरोबर रस्त्यालगत राहणाऱ्या वृद्ध नागरिकांनाही धुळीमुळे श्वासोच्छवासाच्या समस्या, अॅलर्जी आणि आरोग्याचे त्रास भेडसावू लागले आहेत. धुळीचे प्रमाण इतके वाढले आहे की दारे-खिडक्या बंद ठेवूनही घरात धूळ शिरत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांचे म्हणणे आहे की,

 अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग तयार करून वाहतूक वळवावी

रस्त्यावर नियमित पाण्याची फवारणी करावी

 प्रदूषण नियंत्रण विभागाने तातडीने पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात

प्रदूषण नियंत्रण प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन धुळमुक्त वातावरणाची निर्मिती करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

नागठाणे–सासपडे मार्गावर प्रदूषणामुळे वाढणारे आरोग्याचे धोके लक्षात घेता प्रशासनाने वेळीच कडक पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Post a Comment

0 Comments