Type Here to Get Search Results !

"शेतकऱ्यांनी कर्जभरती थांबवून असहकार आंदोलन सुरू करावे – स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके"


"शेतकऱ्यांनी कर्जभरती थांबवून असहकार आंदोलन सुरू करावे – स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके"

प्रमोद पंचपोर:

वेणेगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमुक्तीसाठी जोरदार लढा उभारला असून “शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे” या भूमिकेसह आजपासून असहकार आंदोलनाची घोषणा केली आहे. “फक्त संघटना लढून चालणार नाही, लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी घरी बसून चालणार नाही,” असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले.

पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराच्या जाळ्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि शोषणच जास्त झाल्याचा अनुभव वर्षानुवर्षे येत असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गातील अनियमित बदल, पिकांचे नुकसान, बोगस खते–बियाणे, हमीभावाची केवळ घोषणा आणि शेतमालाचे मुद्दाम पाडलेले दर या सर्वांनी शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे.

सरकारने सत्तेत येण्याआधी दिलेली कर्जमुक्तीची आश्वासने आजतागायत पूर्ण केलेली नाहीत. “भूक लागली असताना पंचपक्वान्न देतो म्हणत बसल्यासारखी सरकारची भूमिका आहे,” अशी टीका शेळके यांनी केली. आंदोलन झाले की नवनवीन नियम-शर्ती लावून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

शेळके यांची ठाम घोषणा —

आजपासून कोणत्याही शेतकऱ्याने कर्ज भरायचे नाही.

सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

साखर कारखान्यांनी ऊस बिलातून कपात करू नये; तसे करणाऱ्या कारखान्यांना शेतकरी ऊस देणार नाही.

विकास सेवा सोसायट्यांनी बेकायदेशीर वसूली करू नये, अन्यथा स्वाभिमानीकडून तीव्र पावले उचलली जातील.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यातून जबरदस्ती कपात केली तर बँकेचा परवाना रद्द करण्यासाठी आंदोलन उभारले जाईल.

शेतकरी वर्षानुवर्षे कर्जफेड करत करत अधिकच कर्जबाजारी झाला असून बेकायदेशीर वसूलीमुळे अनेकांना मागच्या कर्जमुक्तीतून वंचित राहावे लागल्याचे शेळके यांनी सांगितले.

कोणत्याही शेतकऱ्याला अडचण आल्यास किंवा बेकायदेशीर वसूली झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शेवटी, “कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आता माघार नाही!” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments