“माणसातला माणूस ओळखण्याची कला श्रमसंस्कार शिबिरातून मिळते,” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. सुधाकर बेंद्रे यांनी केले.
प्रतिनिधी - श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे या महाविद्यालयाच्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे बांबवडे, ता. पाटण, जि. सातारा येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते.
डॉ. बेंद्रे पुढे म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिरातून स्वयंसेवकांना श्रममूल्य, परोपकार, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव होते. अनोळखी व्यक्तींशी जुळणारी सोयरीक आणि आपुलकी अनुभवायला मिळते. हे शिबिर व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी व्यासपीठ असून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा निर्माण करते.
अध्यक्षीय भाषणात कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी बांबवडे ग्रामस्थांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. शिबिरामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये मैत्रीचे धागे व स्नेहबंध निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, संस्था प्रार्थना व एनएसएस गीताने झाली. कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप लोखंडे यांनी प्रास्ताविक करून सात दिवसीय शिबिरातील श्रमदान व प्रबोधन उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी कृषीभूषण मा. मनोहर साळुंखे (भाऊ) यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी मनोगतातून कु. अश्विनी पवार, कु. अनिता गायकवाड यांनी अनुभव सांगितले. प्राध्यापक मनोगतात डॉ. सुनील पवार व सौ. सुजाता सणगरे यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन प्रा. शौकत अतार यांनी केले तर आभार डॉ. संतोष सोंडगे यांनी मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे प्रा. सुनीता जाधव, प्रा. संध्याराणी पाटील, प्रा. शुभांगी नाकील व श्री. प्रशांत सावंत यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महात्मा फुले हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. मुकुंद पालकर, डॉ. राजाराम कांबळे, ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी मा. श्री विजय पवार, विठ्ठल पवार, दत्तात्रय पवार, आकाश घाडगे, राजू जाधव, वैभव पवार तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment
0 Comments