शेतकरी कर्जमुक्ती, हमीभाव आणि मूलभूत सुविधांसाठी राजू शेळके यांचा विकासाचा निर्धार
प्रतिनिधी - वर्णे गटातील जनतेशी संवाद साधताना तसेच प्रचार दौऱ्यादरम्यान आयोजित जनसंवाद सभेत राजू शेळके यांनी आपली विकासाची भूमिका मांडली. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतीमालाला योग्य हमीभाव, तसेच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी व वीज समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी उपस्थित ग्रामस्थ, शेतकरी, युवक व महिला वर्गाशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या सर्व योजना तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थाने विकास साधण्याचा आपला संकल्प आहे. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
शेतीमालाला योग्य दर मिळावा, कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी ठोस पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर गावागावातील खराब रस्ते, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि वीजपुरवठ्यातील अडचणी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावी नियोजन राबवले जाईल, असे राजू शेळके यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी या सभेत व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments