Type Here to Get Search Results !

‘धरती माता वाचवा’ अभियान समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद पंचपोर यांची निवड

 ‘धरती माता वाचवा’ अभियान समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद पंचपोर यांची निवड

वेणेगाव (ता. सातारा) | प्रतिनिधी

वेणेगाव ग्रामपंचायतीने पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीसाठी ‘धरती माता वाचवा’ अभियानाची जोरदार सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत या अभियानास अधिकृत मंजुरी देण्यात आली.या वेळी ग्रामपंचायत अधिकारी एम एच आढाव उपस्थित होते.

ग्रामसभेत गावातील शेतीचा दर्जा उंचावण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले. मृदा आरोग्य कार्डाचा प्रभावी वापर, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नियोजन, खतांचा संतुलित वापर तसेच अनधिकृत खत विक्रीवर कडक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी श्री. प्रमोद पंचपोर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. सचिवपदी श्री. विकास घोरपडे यांची निवड करण्यात आली असून प्रमोद सावंत, रामचंद्र कांबळे, कमलाकर घोरपडे, संतोष चव्हाण, विठ्ठल सावंत व साहेबराव चव्हाण यांचा समितीत समावेश आहे. समिती निवडीप्रसंगी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री. सुनिल काटे, सरपंच सौ. वंदना काटे, उपसरपंच सौ. वैशाली चव्हाण सर्व सदस्य तसेच सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व संचालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

दरम्यान, या अभियानास पूरक म्हणून भारत सरकारच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत शेतकरी शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, ड्रोनचा वापर, योग्य खत व औषधांची माहिती तसेच उत्पादन वाढीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शेतीकडे वाटचाल करण्यासाठी वेणेगाव ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल गावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले




Post a Comment

0 Comments