Type Here to Get Search Results !

मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश, उंब्रजला अप्पर तहसीलची मंजुरी

 उंब्रजला अखेर अप्पर तहसीलदार कार्यालयाची मंजुरी

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश; परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट

उंब्रज / प्रतिनिधी :

उंब्रज आणि परिसरातील हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची घोषणा अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवार दि. १० रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, उंब्रजच्या विकास प्रवासातील हा एक टप्पा ठरणार आहे.

तालुक्याच्या फेऱ्यांना पूर्णविराम

आजवर उंब्रज व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना जात, उत्पन्न, रहिवासी दाखले, वारसा नोंदी, फेरफार, जमीन नोंदणी, जमीन संपादनाशी संबंधित प्रकरणे अशा विविध महसूल कामांसाठी तालुका मुख्यालयाची धाव घ्यावी लागत होती. प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि कार्यालयीन विलंब यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होते.

वाढती लोकसंख्या, विस्तारित भौगोलिक क्षेत्र आणि विद्यमान तहसील कार्यालयांवरील वाढता ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा

नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यानंतर प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती मिळणार आहे. सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शकपणे उपलब्ध होणार असल्याने विशेषतः शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

स्थानिक पातळीवरच महसूल सेवा उपलब्ध झाल्याने प्रवासाचा वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे. यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अभिनंदनाचा वर्षाव

या निर्णयानंतर उंब्रज व परिसरातील नागरिकांकडून राज्य शासन तसेच आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर मंजुरी मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

▪️ चौकट ▪️

“प्रशासकीय सेवा आता घराजवळ”

गेली अनेक वर्षे मागणी असलेले उंब्रज अप्पर तहसील कार्यालय अखेर मंजूर झाले. या निर्णयामुळे उंब्रजच्या प्रशासकीय व विकासात्मक प्रवासाला नवे बळ मिळणार आहे. स्थानिक पातळीवर शासन सेवा अधिक परिणामकारकपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उंब्रजसह परिसरातील नागरिकांची महसुली कामे आता उंब्रज येथेच पार पडणार असल्याने वेळ आणि पैशाची बचत होईल, तसेच उंब्रजच्या विकासाला नवी दिशा मिळेल



Post a Comment

0 Comments