पंचांगानुसार १४ मार्च हा मुख्य दिवस — वर्णे–आबापुरीत श्री काळभैरवनाथ यात्रेची भव्य तयारी
वेणेगाव - वर्णे–आबापुरी परिसरातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांच्या वार्षिक यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून दि. १३ ते १६ मार्च २०२६ तसेच १९ मार्च (गुढीपाडवा) या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचांगानुसार शनिवार दि. १४ मार्च २०२६ हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याची माहिती मंदिर समितीतर्फे देण्यात आली आहे.
काही दिनदर्शिकांमध्ये (महालक्ष्मी दिनदर्शिका व इतर) अनावधानाने शुक्रवार दि. १३ मार्च हा मुख्य दिवस दर्शविण्यात आला असला, तरी अधिकृत पंचांगानुसार १४ मार्च शनिवार हाच यात्रेचा मुख्य दिवस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यात्रेचा सविस्तर कार्यक्रम
दि. १३ मार्च (शुक्रवार) रोजी मध्यरात्री १२ वाजता मुख्य मंदिरात हरीजागर होणार असून पहाटे २ वाजता आबापुरी येथे खडावा धारण सोहळा पार पडेल.
दि. १४ मार्च (शनिवार) हा मुख्य दिवस असून दुपारी १२ वाजता डोंगरावरील मंदिरात छबिना काढण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता वर्णे गावातून भव्य मिरवणूक होणार आहे.
दि. १५ मार्च (रविवार) रोजी पहाटे ५.१८ वा. शुभमुहूर्तावर माता जोगेश्वरी यांच्यासोबत विवाहसोहळा (आबापुरी) पार पडणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता निकाली कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगणार आहे.
दि. १६ मार्च (सोमवार) रोजी दुपारी १२ वाजल्यापासून पाखाळणी विधी होईल. सायंकाळी ७ वाजता मुख्य मंदिरात आरती व देवाचा गोंधळ आयोजित करण्यात आला आहे.
दि. १९ मार्च (गुरुवार – गुढीपाडवा) रोजी दुपारी १२ वाजता धूपआरती व पंचांग वाचन होणार आहे.
भाविकांना आवाहन
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता, पाणी, प्रकाशयोजना व सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामस्थ व मंदिर समिती यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सज्ज असून सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments