Type Here to Get Search Results !

महामार्गावर अतिक्रमण; बोरगाव पोलीस कारवाईसाठी बातमीचीच वाट पाहत आहेत का?”

 “नागरिक त्रस्त, अतिक्रमण मस्त; बोरगाव पोलीस प्रशासन मात्र शांत?”

बोरगाव :

बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रमुख महामार्ग व गावातील मुख्य रस्त्यांवर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून याकडे पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले खाद्यपदार्थांचे गाडे, अनधिकृत दुकाने, तसेच हॉटेल आणि व्यावसायिकांनी उभारलेले मोठमोठे फलक यामुळे रस्त्याची मोकळी जागा कमी होत असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला व्यवसायिकांनी अतिक्रमण करून वाहतुकीसाठी असलेली जागा व्यापल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनांना रस्त्याच्या मध्यभागातून मार्ग काढावा लागतो. परिणामी वाहतुकीची कोंडी तर होतेच, पण अपघाताचा धोका देखील वाढत आहे.

संध्याकाळच्या वेळी परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थांचे गाडे, फास्ट फूड स्टॉल आणि इतर व्यावसायिक रस्त्याच्या कडेला गर्दी करून उभे राहत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांना मार्ग काढणे अवघड होते. पादचारी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना तर अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर असतानाही अद्याप ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

“एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बोरगाव पोलीस प्रशासनाने या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.



Post a Comment

0 Comments