Type Here to Get Search Results !

शिरगांवकर एचपी गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; वेणेगाव ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

 शिरगांवकर एचपी गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; वेणेगाव ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

वेणेगाव येथील ग्राहकांना गॅस सिलिंडर वितरणाबाबत गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागत असून, HP Gas वितरक असलेल्या शिरगांवकर गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, एजन्सी कार्यालयात दररोज येणाऱ्या ग्राहकांची नावे रजिस्टरमध्ये नोंदवून घेतली जातात. त्यानंतर संबंधित ग्राहकांना दुसऱ्या दिवशी गॅस घेण्यासाठी बोलावले जाते. मात्र दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर नवीन रजिस्टर काढून पुन्हा नावे लिहून घेतली जातात. त्यामुळे आधी नोंद केलेल्या ग्राहकांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागते. या पद्धतीमुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तहसीलदारांनी घरपोच गॅस वितरणाचे आदेश दिलेले असतानाही संबंधित एजन्सीकडून त्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्राहकांनी गॅस बुकिंग केल्यानंतर तब्बल 45 दिवसांनी नंबर लागत असून, त्यानंतरही पुढील 15 दिवस उलटून गेल्यावरदेखील अनेक ग्राहकांना घरपोच सिलिंडर मिळत नसल्याचे सांगितले जाते.

वेणेगाव येथील नागरिकांना गॅससाठी 15 ते 20 किलोमीटर अंतर पार करून एजन्सीपर्यंत जावे लागते. मात्र तिथेही “आज गॅस उपलब्ध नाही”, “उद्या या” अशा कारणांनी रिकाम्या हाताने परत पाठवले जाते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे.

याशिवाय एजन्सीने दिलेले संपर्क क्रमांक अनेकदा लागत नाहीत. काही वेळा फोन लागला तरी तो उचलला जात नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण अधिकच वाढली आहे.

या मनमानी कारभारामुळे वेणेगावातील ग्राहक संतप्त झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी एजन्सीची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा ही एजन्सी बदलून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिरगांवकर गॅस एजन्सीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. लवकरच याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.



Post a Comment

0 Comments