Type Here to Get Search Results !

लोकनेते स्व. बाबासाहेब चोरेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ३१ मे रोजी भव्य अनावरण



 लोकनेते स्व. बाबासाहेब चोरेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ३१ मे रोजी भव्य अनावरण

चोरे येथे ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी; हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता

उंब्रज प्रतिनिधी / श्रीकृष्ण शिंदे सर

चोरे, ता. कराड : डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या चोरे गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी अनुभवायला मिळणार आहे. लोकनेते स्व. बाबासाहेब चोरेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण जिजामाता विद्यालय, चोरे येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न होणार असून संपूर्ण परिसरात या सोहळ्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

समाजकारण, शिक्षण, सहकार, शेती आणि ग्रामीण विकास या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे लोकनेते स्व. बाबासाहेब चोरेकर हे नाव आजही परिसरासाठी प्रेरणा, विश्वास आणि जनसेवेचे प्रतीक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शेती, रोजगार, वीज आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले.

१९५२ मध्ये सातारा जिल्हा लोकल बोर्ड निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्यानंतर पंचायत समिती कराडचे सभापती म्हणून काम करताना गावोगावी विहिरी खोदण्याचे उपक्रम, शेतकऱ्यांपर्यंत सुधारित बियाणे पोहोचवणे तसेच “पाणी अडवा, पाणी जिरवा” योजनेसारख्या उपक्रमांना गती देत ग्रामीण विकासाला नवी दिशा दिली.

“बहुजन समाजाचा उद्धार हाच आमचा शिक्षण प्रसार” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून त्यांनी १९६५-६६ मध्ये श्री वाग्देवी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्या काळात ग्रामीण आणि डोंगरकपारीतील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असताना त्यांनी ज्ञानाची गंगा थेट गावागावात पोहोचवली. त्यांच्या कार्यातून जिजामाता विद्यालय, चोरे, पद्मावतीमाता हायस्कूल वेणेगाव तसेच इतर अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या.

आज विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेले अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, उद्योजक आणि समाजातील अनेक मान्यवर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची जिवंत साक्ष आहेत. त्यांनी केवळ शाळा उभारल्या नाहीत, तर संपूर्ण समाजाचा आत्मविश्वास उभा केला.

१५ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे विचार, कार्य आणि समाजसेवेची प्रेरणा आजही जनमानसात कायम आहे. त्यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याचा संकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर हा ऐतिहासिक क्षण ३१ मे रोजी साकार होत आहे.

श्री वाग्देवी शिक्षण प्रसारक मंडळ, चोरेकर कुटुंबीय, वाग्देवी शैक्षणिक संकुलातील आजी-माजी सेवक, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बाबासाहेबांवर प्रेम करणारे हजारो नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 




Post a Comment

0 Comments