धनाजी कणसे यांची सातारा तालुकाध्यक्षपदी निवड; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
वेणेगाव: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रिक्त असलेल्या पदांच्या निवड प्रक्रियेत सातारा तालुकाध्यक्षपदी लिंबाचीवाडी (ता. सातारा) येथील युवा पत्रकार धनाजी श्रीमंत कणसे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंदराव वाकडे, राज्य संघटक सिद्धार्थ भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे तसेच सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
निवडीचे पत्र जिल्हा उपाध्यक्ष दत्ता घाडगे व जिल्हा सरचिटणीस प्रमोद पंचपोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी नागठाणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय घोरपडे, ज्येष्ठ पत्रकार सुनील शेडगे, प्रताप भोसले, विकास जाधव यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
धनाजी कणसे यांनी गेल्या दशकभरात पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय राहून सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार तसेच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली आहे. नागठाणे विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक उपक्रम राबवून संघटनात्मक बांधणी मजबूत केली. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर पाठपुरावा करत संघटनेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या याच कार्याची पोचपावती म्हणून त्यांची सातारा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याची भावना पत्रकार व मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल आमदार मनोजदादा घोरपडे, राज्य सहकार संघाचे संचालक धनंजय शेडगे, सातारा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुनील काँटे, बाजार समितीचे संचालक धनाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, राजू शेळके, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, एएसपी स्कूलचे संस्थापक महेंद्र निकम, उद्योजक नितीन साळुंखे, हेमंत निकम यांच्यासह प्रशासकीय, कृषी, क्रीडा, सहकार व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच नागठाणे विभाग पत्रकार संघाचे सर्व सदस्य, लिंबाचीवाडी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धनाजी कणसे यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
चौकट
"पत्रकारिता क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत असताना समाजातील विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पत्रकारांच्या हक्कांसाठी व संघटन बळकटीसाठी अधिक जोमाने काम करेन," अशी भावना नवनिर्वाचित सातारा तालुकाध्यक्ष धनाजी कणसे यांनी व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments