वेणेगाव हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
श्रीकृष्ण शिंदे दि. 15 जून - दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार, दि. १५ जून रोजी राज्यभरातील शाळांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने चैतन्य फुलले. राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' अंतर्गत श्री पद्मावती माता हायस्कूल, वेणेगाव येथेही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुप्रिया काकडे व उपाध्यक्ष पत्रकार श्री. प्रमोद पंचपोर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना व नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास पालक श्री. राहुल सावंत, माजी विद्यार्थी श्री. महेश चव्हाण व सौ. चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण, शिक्षकवृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद पंचपोर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून शाळा व पालकांचे नाव उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देताना, "शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त आणि परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करावे. शिक्षक व पालक यांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत," असे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरे मॅडम यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments