Type Here to Get Search Results !

प्रतापगडाच्या पायथ्याशी शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारावे; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

 प्रतापगडाच्या पायथ्याशी शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारावे; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

नागठाणे, प्रतिनिधी : प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून स्वराज्याच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांचे प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी नाभिक समाज संघटना महाराष्ट्र राज्य व शूरवीर जिवाजी महाले उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अफजलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगी जिवाजी महाले यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचले आणि स्वराज्याच्या इतिहासाला निर्णायक वळण मिळाले. त्यांच्या अद्वितीय पराक्रमामुळेच स्वराज्याची वाटचाल अधिक बळकट झाली. अशा या महान शूरवीराचे योगदान भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावे, इतिहासाचे जतन व्हावे तसेच युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी प्रतापगड परिसरात भव्य आणि आकर्षक स्मारक उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदन स्वीकारून या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच राज्य शासन आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून स्मारक उभारणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी स्वाभिमानी नाभिक समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक-राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अधिकारराव चव्हाण, सातारा जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले, राजे प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष संतोष घाडगे, राज्य उपाध्यक्ष प्रदीप काशीद, राज्य खजिनदार शिवाजी खामकर, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते बाळासाहेब ढवळे, जिल्हा सचिव अमोल काशीद, समिती सदस्य पांडुरंग चव्हाण, संग्राम माने, दाजी सुर्वे, पाटण तालुका अध्यक्ष विक्रम महिपाल, सातारा तालुका अध्यक्ष जगन्नाथ पवार, कराड उत्तर तालुका अध्यक्ष विनायक भोसले यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे स्मारक उभारणे ही केवळ एका समाजाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची भावना असल्याचे सांगितले. “शूरवीर जिवाजी महाले यांच्या शौर्याचा सन्मान आणि इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारणे ही काळाची गरज आहे,” अशी भावना उपस्थित शिवप्रेमींनी व्यक्त केली. 



Post a Comment

0 Comments