Type Here to Get Search Results !

मतदार यादी त्रुटीमुक्त करण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांची विशेष मार्गदर्शन बैठक

 SIR विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला गती; आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत BLO बांधवांची मार्गदर्शन बैठक संपन्न

वेणेगाव, प्रतिनिधी : विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियान प्रभावीपणे राबवून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने आज मत्त्यापूर येथे कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली रहिमतपूर मंडल अंतर्गत वर्णे व नागठाणे जिल्हा परिषद गटातील BLO (बूथ लेव्हल अधिकारी) बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.

बैठकीत मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नव्याने पात्र ठरलेल्या मतदारांची नोंदणी करणे, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे नियमांनुसार वगळणे, तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींची मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मतदार यादी अचूक ठेवण्याची जबाबदारी ही लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. "एकही पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे," असे सांगत त्यांनी सर्व BLO बांधवांना प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.

बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, आवश्यक कागदपत्रे, घरभेटींचे नियोजन, नागरिकांशी समन्वय आणि मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

लोकशाहीच्या बळकटीसाठी अचूक मतदार यादी हीच खरी पायाभरणी असल्याचे अधोरेखित करत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी BLO बांधवांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना आगामी कामासाठी शुभेच्छा दिल्या.

लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी घेतलेला हा पुढाकार विशेष कौतुकास्पद ठरत असून, मतदार जनजागृती व अचूक मतदार नोंदणी अभियानाला यामुळे निश्चितच अधिक गती मिळणार आहे.



Post a Comment

0 Comments