कराड उत्तरच्या वंचित गावांच्या पाण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे आक्रमक
लक्षवेधीतून पाणीप्रश्न ऐरणीवर; मंत्री विखे पाटील यांचे सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
नागठाणे | दि. ४ जुलै २०२६ : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईचा प्रश्न आमदार मनोजदादा घोरपडे यांनी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीद्वारे प्रभावीपणे मांडत सरकारचे लक्ष वेधले. जिहे-काठापूर व टेंभू उपसा सिंचन योजनांमधून वंचित गावांना तातडीने पाणी देण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार घोरपडे यांनी कोरेगाव तालुक्यातील अंभेरी, साप, वेळू, बेलवाडी, पवारवाडी, पिंपरी, जयपूर, कोंबडवाडी, आर्वी या गावांना जिहे-काठापूर योजनेतून, तसेच कराड तालुक्यातील टेंभू, कोरेगाव, सयापूर व सदाशिवगड या गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्याची जोरदार मागणी केली.
यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित गावांचे तातडीने सर्वेक्षण करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
लक्षवेधीला पाठिंबा देताना कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले, "टेंभू या गावाच्या नावाने योजना असूनही त्याच गावाला पाणी मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे."
■ ठळक : कराड उत्तर दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प
लक्षवेधीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले की, आमदार झाल्यापासून जिहे-काठापूर, उरमोडी, गणेशवाडी, काशीळ-समर्थ, भाटमरळी, पाल-इंदोली, हंबरवाडी, टेंभू आणि कोपर्डी लिंक कॅनॉलसह विविध सिंचन योजनांद्वारे अनेक गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही योजना पूर्ण झाल्या असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत.
"आज लक्षवेधीत मांडलेल्या उर्वरित गावांनाही पाणी मिळाल्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के सिंचनाखाली येईल आणि दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
■ बातमीतील ठळक मुद्दे
विधानसभेत आमदार मनोजदादा घोरपडे यांची लक्षवेधी.
जिहे-काठापूर व टेंभू योजनांमधून वंचित गावांना पाण्याची मागणी.
जलसंपदा मंत्र्यांचे तातडीच्या सर्वेक्षणाचे आश्वासन.
आमदार अतुलबाबा भोसले यांचा लक्षवेधीला पाठिंबा.
कराड उत्तर शंभर टक्के सिंचनाखाली आणण्याचा निर्धार.

Post a Comment
0 Comments