Type Here to Get Search Results !

'शिवराज्याभिषेक' नाटकासाठी प्रथमेश देशपांडे यांना राज्यस्तरीय अभिनय गुणवत्ता पारितोषिक

 'शिवराज्याभिषेक' नाटकासाठी प्रथमेश देशपांडे यांना राज्यस्तरीय अभिनय गुणवत्ता पारितोषिक

 प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत सातारा केंद्रावर सादर झालेल्या 'शिवराज्याभिषेक' या ऐतिहासिक नाटकातील प्रभावी, दमदार आणि आशयघन अभिनयाबद्दल प्रथमेश देशपांडे यांना अभिनय गुणवत्ता पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.

पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे आयोजित विभागीय पारितोषिक वितरण समारंभात ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या हस्ते प्रथमेश देशपांडे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यातील विविध केंद्रांमधून निवड झालेल्या उत्कृष्ट कलावंतांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात प्रथमेश देशपांडे यांच्या अभिनयाची विशेष दखल घेण्यात आली.

'शिवराज्याभिषेक' या नाटकामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेतील भावस्पर्शी संवादफेक, प्रभावी देहबोली, रंगमंचावरील आत्मविश्वासपूर्ण वावर आणि पात्राशी असलेली एकरूपता यामुळे परीक्षकांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे सातारा केंद्राच्या नाट्य परंपरेलाही राज्यस्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे.

या राज्यस्तरीय यशाबद्दल प्रथमेश देशपांडे यांच्यावर नाट्यरसिक, सहकलाकार, दिग्दर्शक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सातारा जिल्ह्याच्या नाट्य चळवळीला नवी प्रेरणा मिळाली असून, आगामी काळातही त्यांच्या कलाविष्कारातून अशीच उल्लेखनीय कामगिरी घडावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



Post a Comment

0 Comments