शेतकऱ्यांच्या सौर पंपासाठी विधानसभेत आमदार मनोज घोरपडे आक्रमक; "३० दिवसांत कनेक्शन द्या, अन्यथा कारवाई करा
वेणेगाव (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी सौर पंप योजनेतील होत असलेल्या विलंबाचा मुद्दा आज विधानसभेत जोरदारपणे उपस्थित करत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शासनाचे लक्ष वेधले. औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडत सौर पंप बसविण्याची जबाबदारी असलेल्या कंपन्यांच्या दिरंगाईवर कठोर शब्दांत टीका केली.
आमदार घोरपडे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिवसा अखंड आणि दर्जेदार वीज उपलब्ध व्हावी, सिंचन व्यवस्था सक्षम व्हावी आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने कृषी सौर पंप योजना सुरू केली. या योजनेवर विश्वास ठेवून हजारो शेतकऱ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केली, शासनाने सांगितल्याप्रमाणे अनामत रक्कम (डिपॉझिट) भरली तसेच लाखो रुपये खर्च करून शेतामध्ये पाइपलाइन व इतर आवश्यक कामे पूर्ण केली.
मात्र, शासनाच्या नियमानुसार ६० दिवसांच्या आत सौर पंपाचे कनेक्शन देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात अनेक पात्र शेतकरी दोन-दोन वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. नियुक्त कंपन्यांकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.
सिंचनासाठी आवश्यक सौर पंप वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकू लागले आहेत. शेतीचा खर्च वाढत असताना उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडत असल्याची वस्तुस्थिती आमदार घोरपडे यांनी सभागृहासमोर मांडली.
यावेळी त्यांनी शासनाकडे ठोस मागण्या करत, सर्व अटींची पूर्तता करूनही शेतकऱ्यांना वेळेत सौर पंप न देणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना पुढील ३० दिवसांच्या आत प्राधान्याने सौर पंप बसवून देण्यात यावेत आणि या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतलेली आक्रमक भूमिका आणि शासनाला दिलेला ठाम इशारा यामुळे हा विषय विधानसभेत विशेष चर्चेचा ठरला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने आवाज उठविणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका अधोरेखित केली.
दरम्यान, उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी आमदार घोरपडे यांच्या भूमिकेचे स्वागत करत, "शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करणारे आणि विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठवणारे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे आमदार म्हणजे मनोजदादा घोरपडे," अशी भावना व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments