युवकांनी यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे .
प्रा. डॉ. सुरज चौगुले
वेणेगाव - तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे तीन तारुण्याचे तकार ज्याच्याकडे असतात तो तरुण समजला जातो. हे तारुण्याचे तेज चेहऱ्यावर येण्यासाठी कठोर तपश्चर्या करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन युवकांच्यात एक चांगले जग निर्माण करण्याची शक्ती असते. मात्र मी कोण होणार आहे हे ठरवून स्वतःचा चेहरा ओळखून कठोर परिश्रम केले पाहिजेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे. असे उदगार प्रा. डॉ. सुरज चौगुले (सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक , इस्लामपूर ) यांनी काढले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे या महाविद्यालयात वार्षिक वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ सुरज चौगुले आपल्या भाषणात पुढे म्हणाले, आजच्या तरुणांच्या समोर असणारे आदर्श चुकीचे आहेत. आपले आई-वडील हेच आपल्यासाठी आदर्श असले पाहिजेत. तारुण्याचं आयुष्य निघून जाणार आहे पण जाणिवा मात्र जिवंत ठेवा. तारुण्य हे बहरण्यासाठी आहे ते कोमेजून देऊ नका. तारुण्यातून प्रौढावस्थेत जात असताना तारुण्यात जगल्याचा अभिमान बाळगता आला पाहिजे असे जगावे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले , झाडाला आतून पाने फुटलेली असतात म्हणून ती टिकतात. आजच्या युवकानी आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करण्यासाठी कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. आपल्या नावाने जेव्हा स्वतःच्या आई-वडिलांना ओळखलं जाईल तेव्हाचा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च असेल.
या कार्यक्रमात कृषीभूषण श्री मनोहर साळुंखे (भाऊ) व मुख्याध्यापक श्री संजय नलावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त करून ग्रामस्थांच्यावतीने सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात मा. श्री.घनश्याम ताटे यांनी त्यांच्या दिवंगत बंधूच्या स्मरणार्थ महाविद्यालयास १११११ रूपयाची देणगी प्राचार्यांच्याकडे सुपूर्द केली.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांचा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा जिल्हा सहाय्यक विभागप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शा. शि. संचालक डॉ. लक्ष्मण दोडमणी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा स्मिता कालभूषण यांनी केला. वर्षभरात महाविद्यालयाने राबवलेल्या उपक्रमांचे अहवाल वाचन प्रा.अभय जायभाये यांनी केले. प्रमाणपत्र वितरणाचे वाचन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. संतोष निलाखे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जयमाला उथळे केले तर आभार राजाराम कांबळे यांनी मानले . या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ परीक्षेत, सांस्कृतिक विभाग व खेळात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्ते तसेच एन.सी.सी ,एन.एस.एस, तसेच सरल हिंदी कोर्स मधील प्राविण्य मिळविलेल्या स्वयंसेवकांचा शिल्ड , प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मा.सचिन पाटील, मा. वसंत पवार , मा.घनश्याम ताटे, मा. बाळासाहेब पवार, मा. गणेश साळुंखे , मा संतोष साळुंखे , मा. प्रकाश नलावडे, मा. मधाळे सर, मा गोरख यादव, श्री.पवार सर, श्री आण्णासो पाटील , मा. रामचंद्र साळुंखे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर

Post a Comment
0 Comments