Type Here to Get Search Results !

श्री पद्मावती देवीचे निष्ठावान भगत, देवमाणूस जगन्नाथ हरिबा शितोळे यांचे निधन – वेणेगावने हरवला आपला आध्यात्मिक आधारवड

 

वेणेगाव  - गावातील जेष्ठ नागरिक, श्री पद्मावती देवीचे निष्ठावान भक्त आणि धर्मपरायण व्यक्तिमत्त्व जगन्नाथ हरिबा शितोळे (वय 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वेणेगाव गावाने केवळ एक जेष्ठ नागरिक गमावले नाही, तर एक सत्शील, विनम्र आणि सर्वांचा आधारवड हरपला आहे.

शितोळे दादा हे संपूर्ण गावाचे श्रद्धास्थान होते. त्यांच्या जीवनात भक्ती, सेवा आणि प्रेम यांचे त्रिसूत्र समरसले होते. त्यांनी आपल्या आयुष्याची अखेरची श्वासदेखील श्री पद्मावती देवीच्या चरणी अर्पण केली. गावातील प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांची उपस्थिती ही पुण्यप्राप्तीची अनुभूती देणारी ठरत असे.

ते नेहमी सांगायचे – "देव ही भावना आहे, ती माणसात पाहिली पाहिजे."

हा विचार त्यांनी आयुष्यभर आचरणात आणला. नामस्मरण, कीर्तन, उत्सव, पारायण असो, की कोणाचेही दुःख असो – दादा नेहमी पुढे असायचे. माणसांमध्ये देव शोधत त्यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून, अंत्यसंस्कारावेळी गावकऱ्यांची भावनिक गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि हृदयात एकच भावना होती –

"दादा गेले... पण त्यांच्या रूपात देवच वावरत होता!"

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा एक कुटुंबप्रमुखाचा मोठा परिवार आहे.

त्यांचं शांत, संयमी आणि भक्तिभावाने भरलेलं जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या आठवणी, शिकवण आणि प्रेमळ अस्तित्व गावाच्या अंत:करणात सदैव जिवंत राहील.

🌼 दादांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🌼



Post a Comment

0 Comments