म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; अवघ्या 5 तासात ट्रॅक्टर चोरटा गजाआड
म्हसवड पोलिसांनी चोख तपास व तत्पर कारवाई करत ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस आणत आरोपीस अटक केली आहे.
प्रतिनिधी - हिंगणी (ता. माण) येथील अनिल विष्णू माने यांच्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (MH 11 CW 3985) हा घराजवळून चोरीस गेला होता. फिर्यादीने शोधाशोध केली परंतु ट्रॅक्टर न मिळाल्याने म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुप्त माहिती व तांत्रिक तपासाअंती आरोपी धनाजी पुनाजी लोखंडे (रा. दिवड, ता. माण) याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता; मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने चोरलेला ट्रॅक्टर गोंदवले बुद्रुक येथील चिक्कू बागेत लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने तेथे धाड टाकून तब्बल ₹८ लाख ५० हजार किमतीचा ट्रॅक्टर हस्तगत केला.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस अंमलदार शहाजी वाघमारे, अमर नारनवर, मैना हांगे, वसीम मुलानी, विकास ओंबासे, संतोष काळे यांनी सक्रिय सहभाग घेतला
अवघ्या काही तासांत चोरी उघडकीस येऊन आरोपी गजाआड झाल्यामुळे फिर्यादी तसेच नागरिकांनी म्हसवड पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments