बोरगाव पोलीसांनी हरविलेल्या १२ वर्षाच्या मुलीचा २४ तासात केला यशस्वी शोध!
बोरगाव, ता.सातारा (प्रतिनिधी) – बोरगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमता आणि सहकार्यामुळे एक हरविलेली १२ वर्षीय मुलगी केवळ २४ तासांत सुरक्षितपणे शोधण्यात यश आले आहे. ही घटना दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. समाधान जगन्नाथ कोळेकर यांनी त्यांच्या मुलीचा अचानक गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.
तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी.पथकातील अंमलदार व स्थानिक पोलिसांनी शोध मोहिमेची सुरूवात केली. सीसीटीव्ही तपासणीवरून मुलगी पालीकडे जात असलेली आढळली. तिथल्या खंडोबा मंदिरात ती संध्याकाळपर्यंत दिसून आली, पण मंदिरातून बाहेर पडल्यावर तिचा मागील ठावठिकाणा मिळाला नाही.
तांत्रिक विश्लेषणामुळे मुलीचा आईकडून आलेल्या मोबाइल नंबरवरून ठावठिकाणा मिळवता आला, आणि मुलगी बाळुमामा मंदिर, आदमापुर (जि.कोल्हापुर) येथे असल्याची माहिती समोर आली. यानंतर स्थानिक पोलीस अधिकारी व गुन्हे शाखेच्या मदतीने शोधामुळे मुलगी मंदिराच्या आवारात सुरक्षित अवस्थेत सापडली.
शेखर रेवलकर नावाच्या स्थानिक व्यक्तीने मुलीची काळजी घेतली; तिला जेवण, कपडे, तसेच प्रवासासाठी मदत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला आदमापुर एस.टी. बसमध्ये बसवून स्वतःचा मोबाइल नंबर देऊन खर्चासाठी १,००० रुपये दिले.
या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा व कोल्हापुर पोलीस दलातील विविध अधिकारी व अंमलदारांनी मोलाचे योगदान दिले.
पोलीस प्रशासनाने यानिमित्ताने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे आणि त्यांच्या भावनांची समज घडवून त्यांच्यावर योग्य बालसंस्कार करणे हे काळाची गरज ठरली आहे.
कौतुकास्पद चौकट :
सहा. पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांचा उल्लेखनीय सहभाग
सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नात सहा. पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी अपहृत मुलीच्या शोधात अत्यंत महत्वपूर्ण आणि कौतुकास्पद भूमिका बजावली. मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे डॉ. सागर वाघ यांनी कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि भुदरगड पोलीस ठाण्याशी तत्परतेने समन्वय साधत कारवाईस गती दिली.
त्यांनी केलेल्या सतर्क आणि वेगवान कृतीमुळे अपहृत मुलगी केवळ २४ तासांत सुखरूप मिळून आली. पोलिसांची सामाजिक उत्तरदायित्व जपणारी ही कृती म्हणजे डॉ. सागर वाघ यांच्या सेवा वृत्तीचे आणि दक्षतेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
पोलिस दलाच्या कार्यक्षमतेची आणि समाजाप्रती सेवा भावनेची जाणीव जागवणार्या डॉ. सागर वाघ यांना मनःपूर्वक सन्मान व शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments