Type Here to Get Search Results !

"स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ग्रामीण युवकांना कामेरीत सुसज्ज ग्रंथालयाचा मोठा आधार"

 "स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ग्रामीण युवकांना कामेरीत सुसज्ज ग्रंथालयाचा मोठा आधार"


वेणेगांव - कामेरी (ता. सातारा) येथे युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेला आता आणखी बळकटी मिळाली आहे. पुणे येथील दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा, कृषी, अध्यात्म, मनोरंजन आदी विविध विषयांवरील पुस्तके मोठ्या प्रमाणावर या ग्रंथालयाला उपलब्ध करून देण्यात आली.

या पुस्तक वितरण समारंभात बोलताना कामेरीच्या महिला सरपंच शुभांगी घाडगे म्हणाल्या, “स्पर्धेच्या युगात युवकांनी यश मिळवायचे असेल तर ग्रामीण भागात सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी ही काळाची गरज आहे. गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेत प्रशासकीय सेवेत यशस्वी व्हावे, हीच अपेक्षा आहे.”

गेल्या काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेला गावातील तसेच इतर गावांतील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बैठकीसह आवश्यक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या या केंद्रात स्पर्धा परीक्षा वाचनासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून दीपस्तंभ ट्रस्टच्या योगदानामुळे याला अधिक भरीव स्वरूप प्राप्त झाले आहे.

पुस्तक वितरण समारंभास दीपस्तंभचे रणजीत जाधव, निरंजन वैशानपायन, प्रदीप सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपसरपंच राजेंद्र घाडगे, सोसायटीचे चेअरमन गणपत घाडगे, तंटामुक्ती अध्यक्ष बापू घाडगे, हायस्कूलचे मुख्याध्यापक कदम सर, किरण यादव, राजे प्रतिष्ठान अध्यक्ष संतोषदादा घाडगे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ग्रंथालय अभ्यासिकेमुळे गावातील युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले असून ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे.




Post a Comment

0 Comments