म्हसुर्णेत ६० महिलांना आर्थिक व डिजिटल साक्षरतेचे बहारदार प्रशिक्षण – सशक्ततेकडे ठाम पाऊल
वेणेगाव - म्हसुर्णे (ता. खटाव) | स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर यांच्या सहकार्याने, लाडली फाउंडेशन व एनपीएसटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आर्थिक व डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम माऊली मंदिर, म्हसुर्णे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या कार्यक्रमात तब्बल ६० महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आणि सशक्ततेकडे ठाम पाऊल टाकले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य अक्रीम मुल्ला यांनी केले. प्रारंभी प्रार्थना करण्यात आली. यानंतर महिलांना इन्शुरन्स, डीजी गोल्ड, एनपीएस, टाईम पे, डीजे लॉकर तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे काही प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वतः प्रात्यक्षिक दाखवत इतर महिलांच्या मोबाईलवर ‘डीजे लॉकर’ व ‘टाईम पे’ अॅप डाऊनलोड करून वापर दाखवून दिला. त्यामुळे प्रशिक्षण केवळ सैद्धांतिक न राहता प्रत्यक्ष उपयोगीही ठरले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाभिमानी महिला सखी मंच संपर्क प्रमुख दादासाहेब घोरपडे यांचे विशेष योगदान राहिले, तर आर्थिक व डिजिटल साक्षरतेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रशिक्षक प्रमोद पंचपोर यांनी दिले.
या प्रसंगी ग्रामपंचायत म्हसुर्णेच्या लोकनियुक्त सरपंच सोनाली महेश पवार, ग्रामपंचायत सदस्य अक्रीम मुल्ला, माजी सदस्य संगीता गुरव, अनिता तोरणे, दिव्या पवार, कृषी सहाय्यक स्नेहल बुबने, बचत गट CRP स्वाती विभुते, अंगणवाडी मदतनीस आयेशा महापुले, स्वाभिमानी महिला सखी मंच म्हसुर्णे प्रतिनिधी शुभांगी माने आदी महिला व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्ष समता ताई घोरपडे, कार्याध्यक्ष तेजस्विनी ताई घोरपडे तसेच कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोज दादा घोरपडे यांचे महिलांनी विशेष आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शुभांगी माने यांनी केले.
सरपंच सोनाली पवार यांचे मनोगत
"आजच्या युगात आर्थिक व डिजिटल साक्षरता ही प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत गरजेची आहे. मोबाईलच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, डिजिटल पेमेंट्स, विमा योजना व सुरक्षित कागदपत्र साठवणुकीची माहिती मिळाल्याने महिलांना स्वावलंबी होण्याचा मार्ग मोकळा होतो. आपल्या म्हसुर्णे गावातील ६० महिलांनी आज याचा लाभ घेतल्याचा मला अत्यंत आनंद आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना ग्रामपंचायतकडून संपूर्ण सहकार्य राहील."
प्रशिक्षणा दरम्यान देण्यात आलेल्या प्रमाणपत्रासह प्रशिक्षणार्थी

Post a Comment
0 Comments