Type Here to Get Search Results !

म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : 24 तासांत केबल चोरी प्रकरण उघडकीस

 म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : 24 तासांत केबल चोरी प्रकरण उघडकीस

म्हसवड (ता. माण) – शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारीसाठी लागणारी तब्बल 1500 फूट लांबीची थ्री फेज मोटर केबल चोरीला गेल्याची घटना घडली होती. म्हसवड पोलिसांनी केवळ 24 तासांत या चोरीचा उलगडा करून दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेली केबल ताब्यात घेतली आहे.

तक्रारदार नवनाथ लुबाळ, रा. मासाळवाडी, ता. माण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची गंभीर दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पथकासह परिसरात पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.

पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी माळशिरसकडे पळ काढणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनीच चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून संपूर्ण 1500 फूट केबल हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यातील मालाची शंभर टक्के रिकव्हरी करण्यात यश आले आहे.

अटक आरोपी :

1. संजय महादेव दडस (रा. मासाळवाडी, ता. माण, सध्या रा. चादापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर)

2. तुकाराम आप्पा लुबाळ (रा. मासाळवाडी, ता. माण, जि. सातारा)

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, शहाजी वाघमारे, महिला हवालदार नीता पळे, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले व महावीर कोकरे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार नीता पळे करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी रणजीत सावंत यांनी म्हसवड पोलीस ठाण्यास भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पुढील तपासात आरोपींनी अन्य गुन्हे केले आहेत का याबाबत छाननी सुरू आहे.



Post a Comment

0 Comments