नागठाणे (प्रतिनिधी) – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नागठाणे महाविद्यालयाने आपल्या ‘सोयरीक’ या प्रभावी एकांकिकेच्या सादरीकरणातून शिवाजी विद्यापीठाच्या ४५व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावला. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा येथे पार पडलेल्या या महोत्सवात समाजातील संवेदनशील प्रश्नाला स्पर्श करणारी ही एकांकिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत विजेतेपदावर विराजमान झाली.
कोरी पाटी प्रॉडक्शनचे संचालक नितीन पवार यांच्या लेखणी आणि दिग्दर्शनातून रंगलेल्या या कलाकृतीने नागठाणे महाविद्यालयाच्या कला परंपरेची हॅट्ट्रिक साधली. ‘फराळ’, ‘शहीद’, आणि ‘पॉझिटिव्ह’ नंतर ‘सोयरीक’ने मिळवलेले यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
फक्त एकांकिकाच नव्हे, तर भारतीय समूहगीत स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकावत दुहेरी यशाची नोंद केली.
या कामगिरीबद्दल कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिव प्राचार्या शुभांगीताई गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे तसेच प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी सर्व सहभागी कलाकारांचे अभिनंदन करत आगामी मिरज येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. संतोष निलाखे, कोरी पाटी प्रॉडक्शनचे संचालक श्री. नितीन पवार यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे अथक परिश्रम कारणीभूत ठरले. कला आणि साहित्याची सुंदर सांगड घालत नागठाणे महाविद्यालयाने जिल्हास्तरीय पातळीवर आपल्या कलाविष्काराचा डंका वाजवला आहे.

Post a Comment
0 Comments