वेणेगांव : (प्रतिनिधी)
यंदाचा गणेशोत्सव हा बोरगाव पोलीस ठाण्याच्या दक्ष, संवेदनशील आणि सकारात्मक पुढाकारामुळे खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध, शांततामय व समाजोपयोगी ठरला आहे. हद्दीतील ५१ गावांमधील १४३ गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारंपरिक पद्धतीने, कुठल्याही डॉल्बी-लेझरशिवाय, तसेच पर्यावरणपूरक मार्गाने उत्सव पार पाडला.
गावागावांत ‘एक गाव – एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीपणे राबली. समाजातील ऐक्य वृद्धिंगत करताना मंडळांनी वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान, डोळे व दंत तपासणी शिबिरे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या. यामुळे उत्सवाला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक व शैक्षणिक अधिष्ठान लाभले.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश रेसमीया, सहाय्यक पोलीस अधीक्षक शैलेश कडूसकर, सातारा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी सलग काही आठवडे गावोगावी जाऊन मंडळांना समजावले, प्रेरित केले व थेट जनतेशी संवाद साधला. त्यांच्या या सततच्या उपस्थितीमुळेच गावकऱ्यांचा उत्सवावरील विश्वास दृढ झाला आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले.
यंदा उत्सव काळात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. डॉल्बी व लेझरला पूर्णविराम देत उत्सव श्रवणीय व दृष्टीसुखद ठरला. यामुळे पर्यावरण, विद्यार्थी व सामान्य नागरिक यांना दिलासा मिळाला. पोलिसांचे हे जनजागृती व शिस्तीचे कार्य केवळ प्रशंसनीयच नाही तर समाजासाठी प्रेरणादायी आहे.
गावागावांत नागरिकांनी व गणेश मंडळांनी बोरगाव पोलिसांचे खुलेपणाने कौतुक केले. "पोलिसांनी दाखवलेला संयम, दिलेले मार्गदर्शन आणि दाखवलेली तत्परता यामुळेच आज आपला गणेशोत्सव आदर्श ठरला आहे," अशा प्रतिक्रिया ठिकठिकाणी उमटल्या.
बोरगाव पोलिसांनी घडवून आणलेला हा आदर्श उत्सव हा सातारा जिल्ह्यासाठी अनुकरणीय ठरला असून पुढील पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments