पाटण तालुका तलाठी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी कैलास भोसले यांची बिनविरोध निवड
◀️ “सभासदांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील राहीन” – कैलास भोसले
पाटण : पाटण तालुका तलाठी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी कैलास भोसले यांची बिनविरोध निवड झाली. 13 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा कार्यकारिणीच्या दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. चंद्रकांत पारवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत सर्वानुमते कैलास भोसले यांच्यावर तालुका संघटनेची धुरा सोपवण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत विभागीय अध्यक्ष म्हणून लुगडे, सरचिटणीस अजिंक्य जाधव, उपाध्यक्ष शशिकांत बोबडे, कार्याध्यक्ष पटवर्धन, कोषाध्यक्ष तोहीद मुल्ला, तर महिला प्रतिनिधी म्हणून मोहिनी शिंदे यांची निवड करण्यात आली.
आष्टे (ता. सातारा) येथील कैलास भोसले हे यापूर्वी सातारा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष राहिले असून, संघटनेच्या सभासदांच्या हक्क आणि कल्याणासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. सध्या ते संभाजीनगर (ता. पाटण) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. पदभार स्वीकारताना कैलास भोसले यांनी “सभासदांच्या हितासाठी व संघटनेच्या बळकटीसाठी सतत प्रयत्नशील राहीन,” असे आश्वासन दिले.
या निवडीबाबत उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे व तहसीलदार अनंत गुरव यांनी कैलास भोसले तसेच नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. बैठकीस संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments