वेणेगाव विद्यालयातील संतोष पवार यांची लिपिक पदावर पदोन्नती, ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार
वेणेगाव : श्री पद्मावती माता विद्यालय, वेणेगाव (ता. सातारा) येथे शिपाई पदावर दीर्घकाळ सेवा बजावलेले संतोष पवार यांची पदोन्नती होऊन त्यांची निवड लिपिक पदावर झाली आहे. या गौरवशाली क्षणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.
सत्कार कार्यक्रमात वेणेगावच्या माजी सरपंच व रहिमतपूर मंडल भाजपा उपाध्यक्ष सौ. धनश्री सावंत तसेच शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार प्रमोद पंचपोर यांच्या हस्ते संतोष पवार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “संतोष पवार हे कर्तव्यदक्ष, निष्ठावान व शिस्तप्रिय कर्मचारी आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच त्यांनी लिपिक पदापर्यंतची मजल मारली आहे. शाळेच्या प्रगतीत त्यांचे योगदान मोठे असून त्यांची पदोन्नती संपूर्ण वेणेगावसाठी अभिमानाची बाब आहे.”
तसेच शिक्षिका मनुकर मॅडम म्हणाल्या, “संतोष पवार यांनी नेहमीच सेवाभावाने काम केले. त्यांची नम्रता, प्रामाणिकपणा आणि कार्यशक्ती ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मेहनतीचा हा योग्य सन्मान आहे.”
या कार्यक्रमात पवार यांची बदली चोरे येथे झाल्याचे घोषित करण्यात आले. पदोनन्नती झाल्याचा आनंद तर सर्वांना झाला, मात्र शाळेतले सर्वांचे लाडके शिपाई काका बदलीमुळे दूर जात असल्याचे दुःखही प्रत्येकाच्या मनात दाटून आले. त्याचप्रमाणे चोरे येथून वेणेगाव विद्यालयात नवीन शिपाई म्हणून रुजू झालेले राजकुमार मोहने (मामा) यांचेही श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले.
संतोष पवार यांनी आपल्या सेवेतून मस्करवाडी व चोरे येथे कष्टपूर्वक कार्य केले असून, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी गवसनी घेत लिपिक पद मिळवले आहे. आपल्या मनोगतात त्यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षकवृंद व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिंदे सर यांनी केले. त्यांच्या प्रस्ताविक भाषणात त्यांनी पवार यांच्या कार्याची सविस्तर उजळणी करून त्यांचे कौतुक केले आणि शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला माजी सरपंच सौ. धनश्री सावंत, राणी सावंत, पत्रकार प्रमोद पंचपोर, विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण सर, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पवार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
.jpg)
Post a Comment
0 Comments