तळबीडमध्ये ३.५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
कराड उत्तरमध्ये भाजप मजबूत – तळबीडच्या विकासाला ५ कोटींची जादा मदत : मंत्री जयकुमार गोरे
तळबीड (ता.कराड) : “तळबीड गावाने इतिहास घडविणारा निधड्या छातीचा सरसेनापती हंबीरराव मोहिते देशाला दिला. अशा गावावर माझे विशेष प्रेम असून तळबीडच्या विकासकामासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही,” असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले. तळबीड येथे तब्बल साडेतीन कोटींच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी व भाजपा प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तळबीड व परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर यांची उपस्थिती होती. तळबीडसह गणातील काही प्रमुख कार्यकर्त्यांचा या वेळी भाजपामध्ये प्रवेश करण्यात आला.
मंत्री गोरे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेत आल्यापासून विकासाचा मोठा वेग वाढला आहे. तळबीडसाठी मागितलेल्या विविध विकासकामांसाठी आणखी ५ कोटी रुपयांची मंजुरी देत आहे.”
आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे आहेत. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला आम्ही महायुती म्हणून एकजुटीने सामोरे जाणार आहोत. उमेश मोहिते व सरपंच मृणालिनी मोहिते यांनी तळबीडसह संपूर्ण गणात उल्लेखनीय सामाजिक कामे केली आहेत.”
आमदार मनोज घोरपडे म्हणाले, “तळबीड हे ऐतिहासिक गाव असून गावातील विकासामुळे पर्यटनाची मोठी संधी निर्माण होईल. कराड उत्तरमधील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही. आमदार फंडातून तर निधी देणारच, परंतु त्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातूनही मतदारसंघातील प्रत्येक गावाला विशेष निधी आणणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्हा परिषद ही भाजप महायुतीची होणार असून कार्यकर्त्यांनी शक्तीने मैदानात उतरावे.”
कार्यक्रमास धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, महेश जाधव, सागर शिवदास, योगीराज सरकाळे, उमेश मोहिते, सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच संगीता मोहिते, राजेंद्र मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट : भाजप प्रवेश
उमेश मोहिते, मृणालिनी मोहिते, संगीता मोहिते, तळबीड ग्रामपंचायत सदस्य प्रशांत यादव, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, कवठे ग्रामपंचायत, केंजळ येथील ग्रामस्थ तसेच बेलवडे हवेलीतील पदाधिकारी यांनी या कार्यक्रमात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Post a Comment
0 Comments