राज्यभर महा ई-सेवा व आधार केंद्र संचालकांचा तीन दिवसांचा संप सुरू
सातारा जिल्ह्यात ९० टक्के केंद्रांचा उत्स्फूर्त सहभाग
वेणेगाव (प्रमोद पंचपोर ) - राज्यभरातील महा ई-सेवा व आधार केंद्र संघटनेच्या आवाहनानुसार आजपासून (१२ नोव्हेंबर २०२५) तीन दिवसांचा संप सुरू झाला आहे. शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, संचालकांनी आपली विविध प्रलंबित मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या संपात सातारा जिल्ह्यात तब्बल ९० टक्के ई-सेवा व आधार केंद्र संचालकांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्हाभरातील अनेक केंद्रे बंद राहिल्याने नागरिकांना काहीसे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील संचालकांच्या न्याय्य मागण्यांना स्थानिक जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
📋 प्रमुख मागण्या
ई-सेवा व आधार केंद्र संचालकांना दरमहा ₹२५,००० मानधन देण्यात यावे.
आपले सरकार सेवा केंद्र / सेतू केंद्र संदर्भातील शासन निर्णयात सुधारणा कराव्यात.
संचालकांना विमा संरक्षण, मृत्युपर्यंत केंद्र हस्तांतरणाचा अधिकार, तसेच नियमित कमिशन व पेमेंट देण्यात यावे.
CMS, MahaOnline व MahaIT यांच्याकडून तांत्रिक सहाय्य व हेल्पलाइन सेवा सुरळीत ठेवाव्यात.
कोणत्याही कारणाशिवाय ब्लॅकलिस्टिंग प्रक्रिया थांबवावी.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, राज्यातील डिजिटल सेवांचे प्रमुख माध्यम असलेल्या ई-सेवा केंद्रांना शासनाकडून पुरेशी दखल मिळत नाही. “आम्ही शासनाच्या प्रत्येक योजनेचा नागरिकांपर्यंत पूल आहोत, पण आमच्याच मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करते,” असे संघटनेचे मत आहे.
संपामुळे आजपासून राज्यातील अनेक महत्त्वाच्या सेवा — जसे की जन्म-मृत्यू दाखले, जात प्रमाणपत्रे, आधार अद्ययावत प्रक्रिया, महसूल व्यवहार आदी सेवा तात्पुरत्या ठप्प झाल्या आहेत. संघटनेने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करत, शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments