वेणेगाव ग्रामपंचायतीचे मोहन आढाव यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट ग्रामसेवक’ पुरस्कार
2020-21 मध्ये ग्रामपंचायत तारगाव (ता. कोरेगाव) येथे केलेल्या कार्याची दखल
प्रतिनिधी (प्रमोद पंचपोर ):-
वेणेगाव (ता. सातारा) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन हणमंतराव आढाव यांना राज्य शासनाने ‘उत्कृष्ट ग्रामसेवक’ पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या कार्याची ग्रामपंचायत तसेच संपूर्ण वेणेगाव गावात उत्स्फूर्त प्रशंसा होत आहे.
2020-21 या कालावधीत मोहन आढाव हे ग्रामपंचायत तारगाव (ता. कोरेगाव) येथे कार्यरत होते. या ठिकाणी त्यांनी स्वच्छता मोहिमा, जलजीवन मिशन, विविध शासन योजना, ई-गव्हर्नन्स, दस्तऐवज व्यवस्थापन, कोरोनाकाळातील तत्पर सेवा, तसेच ग्रामसभांमधील पारदर्शकता अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्वांगीण विकासकार्याचीच राज्य शासनाने दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर केला.
ग्रामसेवक आढाव यांनी ग्रामविकासासाठी सातत्याने धडपड करत गावाच्या प्रगतीला गती दिली. लोकाभिमुख सेवाभाव आणि प्रशासनातील शिस्त यामुळे त्यांच्या कार्यशैलीची जिल्हा व राज्यस्तरावर विशेष नोंद झाली.
या यशाबद्दल वेणेगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला सरपंच वंदना काटे, उपसरपंच वैशाली चव्हाण, सदस्य लिना चव्हाण, धनश्री सावंत, अकबर मुलांणी, विठ्ठल सावंत, हिंदुराव शिंदे, सविता घोरपडे, सुरेश झुंजरे, वेणेगावच्या ग्राम महसूल अधिकारी तेजस्विनी वारके व कर्मचारीवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय, कार्यक्रमाला पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे विशेष उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक मान्यता प्राप्त झाली.
सरपंच वंदना काटे यांनी सांगितले, “मोहन आढाव यांच्या कार्यतत्परतेमुळे तारगाव आणि आता वेणेगाव या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. हा पुरस्कार आमच्या संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
ग्रामस्थांनीही आढाव यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments