वर्णे-आबापुरीत भक्तीमय वातावरणात श्री काळभैरव जन्माष्टमी सोहळ्याचा भव्य उत्सव
अंगापूर, प्रमोद पंचपोर : सातारा तालुक्यातील वर्णे–आबापुरी येथे स्वयंभू श्री काळभैरवनाथांचा पवित्र जन्माष्टमी सोहळा अत्यंत भक्ति-भावात, “चांगभलं” च्या अखंड गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पहाटेपासूनच मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.
सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते १२ होम-हवन विधी पार पडला. संध्याकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत भागवताचार्य संगीत विशारद दीपक महाराज मेटेशास्त्री (केज-अंबाजोगाई, बीड) यांच्या सुश्राव्य कीर्तनाने वातावरण भारावून गेले. त्यानंतर ९.३० ते ११.३० या वेळेत परिसरातील नामवंत भजनी मंडळांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनांनी भक्तिमय रंगत वाढवली.
रात्री बरोबर १२ वाजता नाथपंथी डवरी–गोसावी समाजाच्या पाळण्याने श्रींच्या जन्मकाळाचा मंगल सोहळा साजरा झाला. यावेळी भाविकांनी फुलांची वर्षाव करत “चांगभलं”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला. त्याच क्षणी केलेली फटाक्यांची आतषबाजी सोहळ्याची शोभा अधिकच उजळून टाकणारी ठरली.
देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर तसेच गर्भगृहाची मनमोहक फुलसजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व प्रसाद व्यवस्थेची उत्तम सोय ट्रस्ट व ग्रामस्थांनी केली.
फोटो कॅप्शन :
वर्णे (ता. सातारा) – स्वयंभू श्री काळभैरव जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविकांनी केलेली मोठी गर्दी.
.jpg)
Post a Comment
0 Comments