सातारा शहरात अवैध व्यवसायांवर पोलिसांची धडक कारवाई; 98 आरोपींवर गुन्हे, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा | प्रतिनिधी
सातारा शहर व परिसरातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी सातारा शहर उपविभागातील पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली असून, या मोहिमेत एकूण 70 कारवायांमध्ये 98 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडूकर व उपविभागीय अधिकारी श्री. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर, सातारा तालुका, शाहूपुरी, बोरगाव पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस मुख्यालय यांच्या संयुक्त 18 पथकांनी ही कारवाई केली.
या कारवाईत महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार 19 गुन्हे दाखल करून 39 आरोपींना अटक करण्यात आली असून 6 लाख 94 हजार 318 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दारूबंदी कायद्यानुसार 3 गुन्हे, कोटपा (तंबाखू) कायद्यानुसार 39 कारवाया, अन्न सुरक्षा कायद्यानुसार 1 कारवाई, तसेच एनडीपीएस कायद्यानुसार 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय सातारा शहरातील सेव्हन स्टार इमारतीतील पॅराडाईज कॅफेमध्ये अश्लील कृत्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कॅफे मालकासह पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांततेचा भंग केल्याप्रकरणीही कारवाई करण्यात आली.
या सर्व कारवायांमध्ये एकूण 7 लाख 56 हजार 233 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढेही अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments