ASP कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ‘ASP बाजार’ उपक्रम उत्साहात; विद्यार्थ्यांनी अनुभवली प्रत्यक्ष उद्योजकतेची शाळा
नागठाणे | प्रतिनिधी :
ASP Convent English School येथे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, सर्जनशीलता तसेच आर्थिक व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘ASP बाजार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या उपक्रमाचे उद्घाटन बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर व इतिहास अभ्यासक व संवर्धक आनंदराव जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तर संस्थापक रामकृष्ण निकम, दत्ताजी घाडगे, शिवाजीराव डांगे व धनाजी कणसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमास नागठाणे भाग पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय घोरपडे, सतीश जाधव, महेंद्र निकम (मॅनेजिंग डायरेक्टर), मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया निकम, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, स्टेशनरी, हस्तकला व विविध उपयुक्त वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी ग्राहकांचे स्वागत, वस्तूंची माहिती, दरनिश्चिती व विक्री व्यवहार अत्यंत आत्मविश्वासाने हाताळले. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारकौशल्य, संवादकौशल्य व आर्थिक शिस्तीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
पालक, नातेवाईक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत पालकांनी व्यक्त केले.
शाळेच्या व्यवस्थापन व शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. ‘ASP बाजार’मुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची जाणीव व उद्योजकीय दृष्टिकोन रुजण्यास निश्चितच मदत झाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments