कॉसमॉस फाउंडेशन पुणेकडून श्री पद्मावती माता विद्यालयास संगणक भेट
प्रतिनिधी | वेणेगाव
कॉसमॉस फाउंडेशन पुणे यांच्या वतीने श्री पद्मावती माता विद्यालयास शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संगणक भेट देण्यात आला. या संगणकाचे वितरण शालीय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद पंचपोर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, २६ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात कॉसमॉस फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष विधिज्ञ श्रीपाद पंचपोर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला. फाउंडेशनच्या वतीने इयत्ता पाचवी ते दहावी मधील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रुपये एक लाखांची ठेव ठेवण्यात आली असून, या ठेवीवर मिळालेल्या व्याजाच्या रकमेतून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
याच कार्यक्रमात विधिज्ञ माधव दत्तात्रय पंचपोर यांच्या स्मरणार्थ श्री. नंदकुमार पंचपोर यांनी शाळेच्या शैक्षणिक कार्यास मदत म्हणून रुपये ५१ हजार इतकी आर्थिक मदत दिली. त्यांच्या या योगदानाबद्दल विद्यालय प्रशासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संगणक भेट, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शाळेस दिलेली आर्थिक मदत यामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीस मोठी चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments