स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतील कराड उत्तर सुजलाम-सुफलाम करण्यासाठी प्रयत्न — आमदार मनोज घोरपडे
113 व्या जयंतीनिमित्त प्रीतीसंगमावर अभिवादन • सिंचन, पाणी व रस्ते विकासकामांना गती
वेणेगाव / प्रतिनिधी :
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतीसंगमावर त्यांच्या समाधीस्थळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी स्व. चव्हाण यांच्या दूरदृष्टीतील विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी कराड उत्तर मतदारसंघ सुजलाम-सुफलाम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कृषी, सहकार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राचा भक्कम पाया घातला. राज्याच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यामुळेच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि लोकनेते म्हणून ओळखले जाते. राज्याच्या राजकारणाबरोबरच राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून नियोजित असलेली अनेक विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचेही आमदार घोरपडे यांनी सांगितले. विशेषतः धनगरवाडी-हणबरवाडी पाणीपुरवठा योजना, हिंगोली-पाल उपसा सिंचन योजना तसेच मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कराड उत्तर भागातील शेती, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांचा विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कामे राबवली जात आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले समृद्ध आणि प्रगत कराड उत्तर घडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही आमदार घोरपडे यांनी स्पष्ट केले.
चौकट :
“स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर चालत कराड उत्तर मतदारसंघातील शेती, पाणी आणि पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे.”
— आमदार मनोज घोरपडे

Post a Comment
0 Comments