वेणेगाव येथे सद्गुरू श्री मलंगनाथ महाराज भंडारा उत्सव ८ ते १७ मार्च दरम्यान
वेणेगाव (ता. सातारा) :
वेणेगाव येथील ओम चैतन्य सद्गुरू श्री मलंगनाथ महाराज संजीवन समाधी मठ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सद्गुरू श्री मलंगनाथ महाराज भंडारा उत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव दि. ८ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती सद्गुरू श्री मलंगनाथ महाराज सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ वेणेगाव यांनी दिली.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे पुत्र हिंदवी स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत असलेल्या सद्गुरू श्री मलंगनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मठात दरवर्षी हा भंडारा उत्सव मोठ्या श्रद्धेने आयोजित केला जातो.
उत्सवाची सुरुवात रविवार दि. ८ मार्च (रंगपंचमी) रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत गावातील महिलांच्या उपस्थितीत घाणा भरणे व ध्वज पूजन कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर १४ मार्च रोजी रात्री ७ वाजता मठातील सर्व समाधी स्थळांना चंदन लेप अभिषेक करण्यात येईल.
१५ मार्च (एकादशी) रोजी सकाळी ८ वाजता वेणेगाव गावात भिक्षा मागण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता जमलेल्या धान्याची मोजणी व पूजन होणार असून सकाळी १० ते १२ या वेळेत श्री क्षेत्र करंडी (सातारा) येथील भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होईल. दुपारी १ ते २ वाजता वांग-भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री मानकरी नैवेद्य पूजन तसेच पद्मावती माता भजनी मंडळ, वेणेगाव यांचा भजन कार्यक्रम होणार आहे.
मुख्य भंडारा उत्सव सोमवार दि. १६ मार्च रोजी त्रयोदशी तिथीला साजरा केला जाणार आहे. सकाळी ९ वाजता सद्गुरू श्री मलंगनाथ महाराज यांच्या पादुका पालखी रथातून नागाई डोह (कोपर्डे, कृष्णा नदी) येथे स्नानासाठी नेण्यात येतील. त्यानंतर कोपर्डे गावात भिक्षा संकलन व पादुका पूजन सोहळा पार पडेल. दुपारी १ वाजता कृष्णा नदीजवळील जोतिबा मंदिर येथून महाराजांचा पालखी सोहळा ढोल-ताशांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रारंभ होईल. सायंकाळी ४ वाजता मठात पालखीचे आगमन होऊन सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होईल. त्यानंतर भक्तिगीत, सुगम संगीत व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भाविकांना कण्या भात व मलिदा महाप्रसाद दिला जाणार आहे.
१७ मार्च रोजी लळीत उत्सवाने कार्यक्रमाची सांगता होईल. सकाळी पादुकांचे स्नान, मानकरी व ज्येष्ठांचा सत्कार तसेच पुढील वर्षाच्या उपक्रमांबाबत चर्चा केली जाणार आहे.
या भंडारा उत्सवात पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरू श्री मलंगनाथ महाराजांच्या पादुका व संजीवन समाधीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन सद्गुरू श्री मलंगनाथ महाराज सेवा मंडळ वेणेगाव व समस्त ग्रामस्थ वेणेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments