दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक; भरतगावात महामार्गाचे काम बंद
वेणेगाव, ता. १३ : पुणे–बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाकडे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे भरतगाव व भरतगाववाडी (ता. सातारा) येथील संतप्त ग्रामस्थांनी आज आक्रमक पवित्रा घेत महामार्गाचे काम बंद पाडले. पुलाची उंची वाढविणे तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
भरतगाव व भरतगाववाडी ही दोन्ही गावे पुणे–बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आहेत. मात्र येथे असलेला पुल कमी उंचीचा असल्यामुळे ग्रामस्थ तसेच प्रवाशांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने ये-जा करणे अत्यंत जिकिरीचे ठरते. अनेक वेळा नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो.
या समस्येबाबत दोन्ही गावांतील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतींनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी व पोलिसप्रमुखांनाही निवेदन देऊन परिस्थितीची माहिती देण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर आज सहापदरीकरणाचे काम बंद पाडत तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी संबंधित विभागाचे प्रकल्प व्यवस्थापकही घटनास्थळी उपस्थित होते.
चौकट : ‘रास्ता रोको’चा इशारा
पुलाची उंची वाढवून योग्य रुंदीकरण व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची तातडीने व्यवस्था न केल्यास भरतगाव व भरतगाववाडी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतींच्या वतीने येत्या काळात पुणे–बंगळूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
छायाचित्र ओळ :
भरतगाव : पुणे–बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम बंद करताना संतप्त ग्रामस्थ

Post a Comment
0 Comments