एएसपी कॉन्व्हेंट स्कूलचा राज्यस्तरावर झंझावात – १४ पदकांची दमदार कमाई
वेणेगाव दि. 25 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय बुलढाणा व नांदुरा तेग सु डो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय तेग सु डो (कोरियन कराटे) क्रीडा स्पर्धेमध्ये अपशिंगे मिलिटरी येथील एएसपी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धेत एएसपी स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तब्बल १४ पदकांची कमाई केली. यामध्ये २ सुवर्ण, २ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश असून, शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीचा हा ठसा उमटवणारा पराक्रम मानला जात आहे.
खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्द, मेहनत आणि शिस्तबद्ध सरावामुळे हे यश शक्य झाले आहे. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व शाळेच्या व्यवस्थापनाचा पाठिंबा यामुळे विद्यार्थ्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण निकम, मॅनेजिंग डायरेक्टर महेंद्र निकम, मुख्याध्यापिका सुप्रिया निकम तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्था परिवाराकडून विजेत्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
एएसपी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments