Type Here to Get Search Results !

मसूर पूर्व भागाला 7 मे रोजी पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आमदार मनोजदादा घोरपडे

 मसूर पूर्व भागाला 7 मे रोजी पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आमदार मनोजदादा घोरपडे

वेणेगाव - मसूर (ता. कराड) वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मसूर पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आरफळ कॅनॉलमधून 7 मे रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

चालू वर्षी तीव्र उष्णतेमुळे शेतीसाठी पाण्याची मोठी कमतरता जाणवत आहे. तारळी धरणातील पाण्याची पातळी घटल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. मात्र, कोपर्डी लिंक कॅनॉल सुरू झाल्यानंतर मसूर पूर्व भागाला पाण्याची कमतरता भासलेली नव्हती. यंदा वाढलेल्या मागणीमुळे आणि मर्यादित साठ्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आरफळ कॅनॉलमार्फत कण्हेर धरणाचे पाणी मसूर पूर्व भागासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत.

तारळी धरणातील लिकेज दुरुस्ती तसेच आरफळ कालव्याचे लाईनिंग करून पाणी गळती कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून या उपाययोजना राबविल्या जात असून आमदार घोरपडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.

याशिवाय, हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन योजनेद्वारे कोपर्डी लिंक कॅनॉलमधून तारळी धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, सर्वच भागातून वाढलेल्या मागणीमुळे पाणी रोटेशनमध्ये काही प्रमाणात विलंब होत आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्यावर भर देण्यात येत असून, 7 मे रोजी पाणी सोडल्याने मसूर पूर्व भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

📦 चौकट : वीज पुरवठा सुधारण्यासाठी 90 नवीन डीपी बसविणार

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पुढाकाराने 90 नवीन डीपी बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

65 क्षमतेच्या डीपीच्या ठिकाणी 100 क्षमतेचे डीपी बसविण्यात येणार

100 क्षमतेच्या डीपी असलेल्या ठिकाणी अतिरिक्त डीपी बसविणार

वारंवार डीपी जळणे, फ्युज उडणे आणि लोडशेडिंगच्या समस्येतून सुटका होणार

 या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळून शेतीकामाला गती मिळणार आहे.




Post a Comment

0 Comments