Type Here to Get Search Results !

क्रांती उदय गणेशोत्सव मंडळाची सामाजिक बांधिलकी; “राजा शिवाजी” चित्रपट मोफत दाखवणार

 क्रांती उदय गणेशोत्सव मंडळाची सामाजिक बांधिलकी; “राजा शिवाजी” चित्रपट मोफत दाखवणार

वेणेगाव : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या क्रांती उदय गणेशोत्सव मंडळ, वेणेगाव यांनी पुन्हा एकदा आदर्शवत पुढाकार घेतला आहे. मंडळाच्या वतीने इयत्ता ५वी ते ८वी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी  “राजा शिवाजी” या प्रेरणादायी ऐतिहासिक चित्रपटाचे पूर्णपणे मोफत विशेष प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते पंकज काळे, नितीन सावंत, रजत काटे आणि समाधान यादव यांनी विशेष मेहनत घेतली असून, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी आणि चांगले संस्कार रुजावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

चित्रपटाचे प्रक्षेपण दि. ६ मे रोजी होणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी ४ मे रात्री ९ वाजेपर्यंत आपली नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, प्रथम ५० विद्यार्थ्यांसाठी ये-जा करण्याची मोफत सोय देखील मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक अडथळा न येता या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

नाव नोंदणीसाठी समाधान हॉटेल येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे पूर्णपणे मोफत, शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रम राबविणे ही अत्यंत स्तुत्य बाब असून, क्रांती उदय गणेशोत्सव मंडळ समाजासाठी एक आदर्श निर्माण करत आहे. मंडळाचा हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला दिशा देणारा आहे, त्यामुळे गावकऱ्यांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.



Post a Comment

0 Comments