लेखणीच्या बळावर गवसला ‘आयकॉन ऑफ राजधानी’ पुरस्कार
दै. सकाळचे बातमीदार सुनील शेडगे यांच्या कार्याचा गौरव
वेणेगाव, ता. २० : समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे, उपक्रमशील शिक्षक, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारे शिक्षणप्रेमी आणि मुलखावेगळी माणसे यांची लेखणीद्वारे ओळख करून देणारे दै. सकाळचे बातमीदार सुनील शेडगे यांना राजधानी ट्रेकर्स अँड ॲडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे प्रतिष्ठेचा ‘आयकॉन ऑफ राजधानी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वराज्यविस्तारक हिंदनृपती छत्रपती शाहूराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात न्यायमूर्ती जयवंत यादव, इतिहास संशोधक डॉ. पी. एन. शिंदे, बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर, महाराष्ट्र राज्य सहकार संघाचे संचालक धनंजय शेडगे, संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. विकास पवार आणि कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले.
सुनील शेडगे यांनी सकाळमधून उपक्रमशील शिक्षक, उपक्रमशील शिक्षिका, उपक्रमशील शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, श्रावणवाटा, राऊळी मंदिरी, मुलखावेगळी माणसे अशा विविध लेखमालांद्वारे समाजातील सकारात्मक कार्याला प्रभावी शब्दबद्ध केले आहे. त्यांच्या या संवेदनशील, अभ्यासपूर्ण आणि समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सहयोगी संपादक राजेश सोळसकर, राजेश निंबाळकर तसेच नागठाणे विभाग पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. शेडगे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
छायाचित्र ओळ :
सातारा : दै. सकाळचे बातमीदार सुनील शेडगे यांना ‘आयकॉन ऑफ राजधानी’ पुरस्कार प्रदान करताना धनंजय शेडगे व उपस्थित मान्यवर.

Post a Comment
0 Comments