बोरबन येथे २५ मे पासून भव्य 'अखंड नामजप यज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण' सोहळ्याचे आयोजन
- सात दिवस चालणार अध्यात्माची गंगा; महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची लाभणार मांदियाळी!
कराड/प्रतिनिधी :
कलियुगातील विठ्ठल भक्तीचे आणि सातारा जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री क्षेत्र बोरबन (स्वयंभू पांडुरंग प्रिती पंढरपूर, ता. कोरेगाव) येथे अधिक ज्येष्ठ महिन्यानिमित्त भव्य-दिव्य 'अखंड नामजप यज्ञ सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे' अभूतपूर्व आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, २५ मे २०२६ ते सोमवार, १ जून २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार असून, सात दिवस सातारा जिल्हा आणि पंचक्रोशीतील गावे भक्तीरसात न्हाऊन निघणार आहेत.
या सोहळ्याचे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. करण महाराज व ह.भ.प. विष्णू महाराज भिसे (जोग महाराज संस्था आळंदी) हे काम पाहणार असून, श्रीमद् भागवत कथेचे निरूपण विख्यात प्रवक्ते ह.भ.प. विष्णुपंत महाराज चामणार करणार आहेत.
अशी असेल दैनंदिन कार्यक्रमांची रूपरेषा:
सोहळ्यादरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ६ ते ७ श्री विष्णूसहस्रनाम स्तोत्र, सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १ भोजन व विश्रांती, दुपारी १ ते ३ संगीत भजन, दुपारी ३ ते ५.३० भागवत कथा, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार आहे.
दिग्गज कीर्तनकारांची लाभणार उपस्थिती:
या कीर्तन महोत्सवात दररोज सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील थोर संतांच्या परंपरेतील नामांकित कीर्तनकार सेवा रुजू करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
- २५ मे : ह.भ.प. श्रीगुरु हरिप्रसाद महाराज देहूकर (जगद्गुरु तुकोबारायांचे ११ वे वंशज)
- २६ मे : ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पवार (गाथाकंठभूषण, आळंदी)
- २७ मे : ह.भ.प. वैराग्यमूर्ती उदय महाराज पाटील (आटके)
- २८ मे : ह.भ.प. श्रीपाद महाराज साखराळकर
- २९ मे : ह.भ.प. श्रीगुरु एकनाथ महाराज नामदास (संतशिरोमणी नामदेवरायांचे वंशज)
- ३० मे : ह.भ.प. श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर (जगद्गुरु तुकोबारायांचे १० वे वंशज)
- ३१ मे : ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली, शिरवडे)
- १ जून : ह.भ.प. भागवताचार्य विष्णुपंत महाराज चामणार (बालसंस्कार केंद्र, पार्ले, कराड) यांच्या कीर्तनाने व सार्वजनिक महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.
मोफत भोजन व निवास व्यवस्था:
सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था समितीमार्फत मोफत करण्यात आली आहे. दररोज सकाळी अल्पोपहार, दुपारची व रात्रीची संतपंगत विविध ग्रामस्थ मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बालसंस्कार वारकरी मंडळ (प्रतिष्ठान) पार्ले आणि ग्रामस्थ मंडळ तारगाव यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ अहोरात्र परिश्रम घेत आहेत. तरी या सोहळ्याचा सर्व भाविकांनी, विठ्ठल भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून दर्शनाचा व कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments